राहुरी(वेबटीम) जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने सध्या जिल्ह्यात अवैध व्यवसायावर कारवाईचा बडगा उचलल...
राहुरी(वेबटीम)
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने सध्या जिल्ह्यात अवैध व्यवसायावर कारवाईचा बडगा उचलला असून या पथकातील प्रमुख असलेले परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकून मावा बनविणाऱ्या व पुरवणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याने छोट-मोठ्या टपऱ्यांना अक्षरशः कुलूप लागले आहे. टपरी चालकांचा मुख्य व्यवसाय हा माव्या विक्री असल्याने म् टपरी सुरू न ठेवणे हाच पर्याय स्वीकारला आहे. हे चित्र सध्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह राहुरी फॅक्टरी व परिसरातील गावात बघावयास मिळत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. नेवासा शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय नेस्तनाबूत करणारे परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली आहे.
या टीमच्या माध्यमातून अकोले ते जामखेड असा कारवाईचा धडाका सुरू आहे. अवैध वेश्या व्यवसाय, जुगार अड्डे, मटका खेळविणारे व खेळणारे, अवैध दारू विक्री करणारे यासह इतर अनेक अवैध व्यवसाय उधळून लावले आहेत. अकोले, संगमनेर, पाथर्डी, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव या तालुक्यात गेल्या ५ ते ६ दिवसात अवैध व्यवसायांवर कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत भल्याभल्यांना जेलची हवा दाखविली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मावा व सुगंधी तंबाखू बनविण्याचे व विक्री होत असल्याचे दिसुन येताच पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी याच्या मुळाशी जाऊन मावा तयार करणारे घरगुती कारखानेच टार्गेट केले आहे. मावा विक्रीसाठी आघाडीवर असलेल्या शेवगाव व श्रीरामपूर येथे छापे टाकले. परिणामी जिल्ह्यातील छोट- मोठे मावा विक्री करणाऱ्यांना आपसूक मालच मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
देवळाली प्रवरासह राहुरी फॅक्टरीत अनेक टपऱ्यांवर मावा विक्री केला जातो. मात्र पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी मावा बनविणारे बडे मासेच कामाला लावल्याने आता छोट्या टपरी चालकांपर्यंत मालच मिळत नसल्याने त्यांनी टपरी बंद ठेवणे पसंत केले आहे. आपल्यावर जर कारवाई झाली तर वाट लागलं त्यापेक्षा टपरी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरीत मावा विक्री हाच मुख्य व्यवसाय असलेल्या टपऱ्या लॉक लावलेल्या अवस्थेत दिसत आहे.
कोण साहेब आले काय माहीत राव लयच डेंजर आहेपरिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी जिल्ह्यातील वेश्या व्यवसाय, अवैध दारू विक्री ,मटका जुगार, यासह मावा विक्रीवर करण्याला चांगलाच पायबंद घातला आहे. गावागातील टपऱ्या मावाचा कच्चा माल मिळत नसल्याने बंद आहेत. यामुळे टपरी चालक कोण साहेब आले काय माहिती लयच डेंजर आहे राव अशीच एकमेकांत चर्चा करत आहे.
राहुरीचा नंबर कधी?
राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वेश्या व्यवसाय, हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री, जुगार, मटका, पत्ते क्लब सुरू असून शेवगाव पाथर्डी, जामखेड, श्रीरामपूर प्रमाणे राहुरी तालुक्यात एसपी सोमनाथ घार्गे यांनी नियुक्त केलेल्या पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने अवैध व्यवसायावर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत