देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरासह अनेक नगरपालिकेत भूमिगत गटार योजनेचा ठेका घेणाऱ्या कातोरे पिता-पुत्रांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ग...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरासह अनेक नगरपालिकेत भूमिगत गटार योजनेचा ठेका घेणाऱ्या कातोरे पिता-पुत्रांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहरातील भूमीगत गटारी साफ करण्यासाठी ठेकेदारांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे एक तरुण गुदमरून गटारीमध्येच पडला. म्हणुन त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा तरुण देखील गुदमरून जागीच मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार दि. 10 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात घडली.
यामध्ये अतुल रतन पवार (वय 19, रा. संजयगांधी नगर, ता. संगमनेर), रियाज जावेद पिंजारी (वय 21, रा. मदिनानगर, ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर नगरपालिकेला जाग आली. तेथील स्वछता निरीक्षक अमजद पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रामहरी मोहन कातोरे, निखील रामहरी कातोरे (रा. गोविंदनगर, ता. संगमनेर), मुश्ताक बशीर शेख (रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर) यांच्यावर सदोष मनुष्यवदासह गंभीर कलमान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमजद बशीर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.12 जुलै 2021 आर. एम. कातोरे अँड कंपनी यांना भुमीगत गटार योजनेचे काम दिले आहे. मात्र, या भुमीगत गटारीचे काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे, ते अद्याप नगरपरिषदेकडे ठेकेदाराने हस्तांतरीत केलेले नाही. जो पर्यंत हे काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत योजनेतील सर्व बाबींची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही करारनाम्यातील अट क्र.38 नुसार आर. एम. कातोरे अँड कंपनी रामहरी कातोरे व निखील कातोरे यांची आहे. भुमीगत गटारीचे बांधलेले चेंबरची देखभाल व दुरुस्ती ही देखील संपूर्ण जबाबदारी या ठेकेदारांचीच आहे.
दरम्यान, संगमनेर नगरपरिषदेमार्फत आरोग्य विभागाकरीता संगमनेर शहरातील व उपनगरातील मोठ्या बंदिस्त गटारी साफ करण्यासाठी नगरपालिकेकडुन आदेश काढण्यात आला. हे काम मुश्ताक बशीर शेख याला देण्यात आले. या कामाचा 6 ऑगस्ट 2024 रोजी करारनामा करण्यात आला. या करारामध्ये एकुण 1 ते 30 अटी व शर्ती नमुद करण्यात आल्या. तो कामगारांकडुन गटारी साफ करू लागला. तो गुरुवार दि. 10 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजता आरोग्य विभागाची परवानगी न घेता. कोल्हेवाडी रोडवर पाबळे वस्तीकडे जाणाऱ्या कॉर्नर जवळील बंदिस्त गटार साफ सफाईचे काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे, ठेकेदाराने करारनाम्यातील अट क्र.2 चे उल्लंघन करून कामाला सुरुवात केली. ठेकेदाराने मजुर यांची दक्षता न घेता करारनाम्यातील अट क्र. 6 चे उल्लंघन करून आरोग्य विभागाची पूर्वपरवानगीशिवाय गटारीवरील चेंबरचेसाफ सफाई करण्यात सुरवात केली होती.
देवळालीत कातोरेचाच ठेका
कातोरे यांना देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा ही भूमिगत गटार योजनेचे काम दिले आहे.भूमिगत गटार योजना करण्यासाठी चांगले रस्ते खोदले मात्र हे अद्याप दुरुस्त केले नाही. या बाबत आंदोलन झाली मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे ठेकेदार कातोरे दुर्लक्ष केले आहे.
देवळालीतील ते प्रकरण केलं होतं रफादफा..!
देवळाली प्रवरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असताना वीटभट्टी रोड परिसरात खोडण्यात आलेल्या खड्ड्यात गुदमरून एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावेळी ठेकेदार कातोरे याने पालिकेतील सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून हे प्रकरण रफादफा केले होते. काल संगमनेरला पुन्हा दोन मजूर मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. सुरक्षितेबाबत ठेकेदार कातोरे काळजी घेत नसल्याने उघड झाले आहे. कातोरे पिता-पुत्रांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत