ताहाराबाद(वेबटीम) श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील बेलकरवाडी दक्षिणमुखी हनुमान मित्रमंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्...
ताहाराबाद(वेबटीम)
श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील बेलकरवाडी दक्षिणमुखी हनुमान मित्रमंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बेलकरवाडी ग्रामस्थ व तरुणमंडळाच्या सहकार्यातून बेलकरवाडी येथे भव्य- दिव्य दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर बांधण्यात आले आहे. ह्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये मासिक पौर्णिमा उत्सव, वार्षिक सप्ताह तसेच ज्ञानेश्वरीचे पारायण आदीं धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात.
बेलकरवाडी छोटीशी वस्ती असूनही ताहाराबाद परिसरात ह्या ठिकाणी मोठमोठे धार्मिक उत्सव संपन्न होतात. आगळावेगळा सोहळा ह्या ठिकाणी संपन्न होतो. सालाबाद प्रमाणे चालूवर्षीही मोठा सोहळा संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. ह्या ठिकाणी ज्ञानदानाबरोबर अन्नदानाचाही मोठा यज्ञ संपन्न होणार आहे.त्यामुळे ह्या परिसरात वरूणराजाची कृपादृष्टी होऊन बळीराजा नेहमीच आनंदी असतो. जणू काही आनंदाचे डोही आनंदतरंग, आनंदची अंग आनंदाचे.
श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वणीत सालाबादप्रमाणे आज बुधवार दि.३० जुलै रोजी सप्ताहास प्रारंभ होत असून दि.६ ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताह कालावधीत दैनंदिन काकडा भजन, अभिषेक, आरती, पारायण, नैवद्य, हरिपाठ, कीर्तन व रात्री जागर इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीत महंत लक्ष्मण महाराज पांचाळ, बाबासाहेब महाराज दळवी, उमेश महाराज दशरथे, विष्णु महाराज अंतरकर, विकासानंद महाराज मिसाळ, राम महाराज खरवंडीकर, उद्धव महाराज मंडलिक, अर्जुन महाराज तनपुरे व काल्याचे कीर्तन बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. ह्या ज्ञानदान व अन्नदान सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन बेलकरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे,अशा प्रसन्न वातावरणात संत महिपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्रभूमीत ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. त्याचबरोबर भाविक इच्छा भोजनाचा आनंद द्विगुणीत करणार आहे. ही सोहळ्याची वैशिष्ट्य!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत