ताहाराबाद(वार्ताहर) प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे श्री संत कवी महिपती महाराजांचा २३५वासमाधी...
ताहाराबाद(वार्ताहर)
प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे श्री संत कवी महिपती महाराजांचा २३५वासमाधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संतकवी महिपती महाराजांचा समाधी सोहळा व भक्तविजय ग्रंथाचे पारायण गुरुवार दि.१४ ऑगस्ट ते गुरुवार दि.२१ ऑगस्ट ह्या पर्वणीत होत आहे. ह्या निमित्ताने श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
आषाढ वद्य नवमी ते अमावास्येपर्यंत संत कवी महिपती महाराज पांडुरंगाच्या सेवेत मग्न होऊन श्रावण वद्य द्वादशीला (इ. स. १७९०) मध्ये गुरुवारी मध्यान्ही पांडुरंगाच्या चरणी अनंतात विलीन आले. त्यानिमित्ताने सालाबादप्रमाणे पुण्यतिथी समाधी सोहळा संपन्न होत आहे. पहाटे काकडा भजन, अभिषेक,सकाळी ग्रामप्रदक्षिणा,
नंतर भक्तविजय ग्रंथाचे पारायण, दुपारी १२ वाजता आरती व नैवेद्य, दुपारी ४ वाजता संत चरित्र कथा, सायंकाळी हरिपाठ व रात्री ७ ते ९ वाजता महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा, असे दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत. देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र ताहाराबादला़ भव्यदिव्य प्रहरा मंडपाचे,भटारखान्याचे आयोजऩ करण्यात आले आहे. प्रहरा मंडपातील विद्युत रोषणाईचे आकर्षण, कीर्तनात २०० टाळकरी, सुरूची भोजन, संतचरित्र कथेची श्रवणभक्ती, नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा ही ह्या सोहळ्याची वैशिष्ट्ये ! गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी विशाल महाराज हाडवळे,दि.१५ भागवत महाराज साळुंके,दि.१६ योगीराज महाराज गोसावी, दि.१७ जगन्नाथ महाराज पाटील, दि.१८ कृष्णा महाराज चवरे,दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. एकादशीनिमित्त श्रीराम महाराज झिंजुर्के तर रात्री बाळकृष्ण महाराज कांबळे, दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. संत सेना महाराज व संत कवी महिपती महाराज पुण्यतिथीनिमित्त जयेश महाराज भाग्यवंत तर रात्री पांडुरंग महाराज वावीकर व गुरुवार दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
श्रावण वद्य द्वादशीला ५० हजार पुरणपोळींचे आयोजन करण्यात आले आहे. शके १७३८ च्या सुमारास मल्हारराव होळकर यांनी महिपतींच्या समाधी सोहळ्याला प्रारंभ केला आहे .नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील आंदरसूल येथील शिष्य आनंदराव सटवाजी शेकदार यांनी महिपतींचे समाधी वृंदावन बांधले. श्रावण वद्य द्वादशीला श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे संत कवी महिपतींचे देहावसान व नांदूर खंदरमाळ येथील शिष्य धोंडीभाऊ यांचे देहावसान एकाच वेळी झाले, हे विशेष!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत