(राहुरी : श्रेयस लोळगे) तांदुळवाडी शाळेच्या दुर्दशेला प्रशासन जबाबदार – सरपंच विराज धसाळ आक्रमक राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायत ह...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
तांदुळवाडी शाळेच्या दुर्दशेला प्रशासन जबाबदार – सरपंच विराज धसाळ आक्रमक
राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेची अत्यंत दयनीय स्थिती निर्माण झाली आहे. शाळेत स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येते.
गेल्या वर्षी शासनाच्या माध्यमातून सुमारे ६ ते ७ लाख रुपये निधी खर्चून या शाळेत स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. मात्र सध्या त्या स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत वाईट असून, संपूर्ण शाळा परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे.
नुकतीच ग्रामपंचायतचे सरपंच तथा युवा नेते विराज धसाळ यांनी शाळेची पाहणी केली असता, या समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी या सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दुरवस्थेमुळे पालकांचा शासकीय शाळांवरील विश्वास उडत चालला आहे. अनेक पालक आपली मुले खाजगी शाळांमध्ये पाठवत आहेत, परिणामी जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या झपाट्याने घटत आहे.
"लाखो रुपयांचा निधी वापरूनही जर योग्य देखभाल होत नसेल, तर तो निधी नेमका कुठे जातो?" असा सवाल सरपंच विराज धसाळ यांनी उपस्थित केला आहे.
"शाळेच्या रंगकाम, फरशी बदलणे आणि पत्रे लावणे यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला असला, तरी विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या स्वच्छतागृहाकडे मात्र प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. परिणामी शाळेतील स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे."
ही परिस्थिती पाहता, जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास जनआंदोलनाचा मार्ग अवलंब करू, असा इशाराही सरपंच विराज धसाळ यांनी यावेळी दिला.
या पाहणी दौऱ्यावेळी संदीप म्हसे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम पेरणे, डॉ. मछिंद्र मोरे, अभिजित धसाळ, तसेच अनेक ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत