ताहाराबाद(वेबटीम) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रतिपंढरी श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे आज भाविकांचा जनसागर उसळला. टाळ-मृदुंगाचा गजर...
ताहाराबाद(वेबटीम)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रतिपंढरी श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे आज भाविकांचा जनसागर उसळला. टाळ-मृदुंगाचा गजर आणि जय - जय महिपती, नमो महिपतीच्या नामघोषाने प्रतिपंढरी धन्य झाली. काल श्रावण वद्य द्वादशीच्या पर्वणीत श्रीसंत कवी महिपती महाराज व श्रीसंत सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.भाविंकाची मांदियाळी मंत्रमुग्ध होऊन गेली होती. तर सरत्या श्रावण सरींनाही त्याचा मोह आवरला नाही. श्रावण सरींनीही हजेरी लावून बळीराजा सुकावला!
गेल्या सहा दिवसांपासून श्रीक्षेत्र ताहाराबादला श्रीसंत कवी महिपती महाराजांच्या २३५ व्या समाधी सोहळ्याची आध्यात्मिक पर्वणी चालू आहे. काल सकाळी महाअभिषेक, ग्रामप्रदक्षिणा , आरती, पारायण, भक्तविजय ग्रंथाची मिरवणूक व कीर्तन ह्यासारखे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळच्या सत्रात संत महिपती व संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांचे कीर्तन झाले. तर रात्रीच्या सत्रात पांडुरंग महाराज गिरी,वावीकर यांची कीर्तन सेवा झाली.
देवस्थान व ग्रामस्थांनी सुयोग्य नियोजन करून श्रावण वद्य द्वादशीच्या दिवशी संत सेना महाराज व संत महिपती महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पुरणपोळीच्या पंगतीचे नियोजन केले होते. ताहाराबाद परिसरातील श्रद्धाळू महिलांनी भरगच्च स्वयंपाक करून सप्ताहस्थळी आणला होता. त्यात पुरणपोळी, दूध, सारआमटी, भजे, पापड व भात यासह अनेक मिष्ठान्नाचा समावेश होता. कीर्तनाची सांगता झाल्यावर हजारो भाविकांनी त्याचा आस्वाद घेतला. संत महिपती महाराज समाधी मंदिराचे प्रांगण भाविकांच्या पंगतीने फुलून गेले होते. जणू काही वैष्णवांचा मेळा जमला होता.
श्रावण वद्य द्वादशीच्या पर्वणीत संत महिपतींच्या, संत सेना महाराजांच्या, संत महिपतींचे शिष्य संत धोंडीभाऊ यांच्या निर्वाण दिनानिमित्त अखंड सुरू असलेल्या समाधी सोहळ्याची सांगता गुरुवार दि.२१ ऑगस्ट रोजी महंत अर्जुनजी महाराज तनपुरे यांच्या काल्याच्या कीर्तनसेवेने होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
श्रावण वद्य द्वादशीच्या पर्वणीत संत सेना महाराज व संत महिपती महाराज समाधी सोहळ्यानिमित्ताने महिला भाविकांची महापंगत बसली होती. यावेळी घरोघरी पुरण पोळीच्या स्वयंपाकाची लगबग गृहिणींमध्ये सुरू होती. काही महिलांनी तब्बल १०० पुरणपोळ्या सप्ताहस्थळी आणल्या होत्या. महापंगतीत महिलांनीही वाढण्याची भूमिका बजावून संतसेवेचा आनंद घेतला. भाविकांच्या मांदियाळीने प्रतिपंढरी धन्य झाली!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत