शाळेच्या प्रश्नांवर राजकारण नको, गावाच्या विकासासाठी काम करणार : सरपंच विराज धसाळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शाळेच्या प्रश्नांवर राजकारण नको, गावाच्या विकासासाठी काम करणार : सरपंच विराज धसाळ

(राहुरी श्रेयस लोळगे) "गावातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा, स्वच्छतागृहे आणि दर्जेदार शिक्षण मिळावं, ही सर्वांचीच जबाबदारी आहे. मी ...

(राहुरी श्रेयस लोळगे)

"गावातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा, स्वच्छतागृहे आणि दर्जेदार शिक्षण मिळावं, ही सर्वांचीच जबाबदारी आहे. मी या शाळेत शिकलेलो नसलो, तरी प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी मी जबाबदार असल्याची जाणीव आहे," असं तांदुळवाडीचे सरपंच विराज धसाळ यांनी स्पष्ट केलं आहे.

शाळेतील समस्या आणि मुलांच्या अडचणी याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. "या विषयात कोणतीही वैयक्तिक भावना किंवा राजकीय हेतू नाही. केवळ गावाच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी मी आवाज उठवत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

"शाळेच्या नावावरून राजकारण करणे दुर्दैवी आहे. समस्या शासन दरबारी मांडल्यामुळे गाव बदनाम होत नाही, उलट त्या समस्यांवर तोडगा काढण्याची दिशा मिळते. मी शालेय समितीवर कोणतेही आरोप केलेले नाहीत, माझा उद्देश फक्त प्रशासकीय पातळीवर सुधारणा घडवून आणणे हाच आहे," असं धसाळ म्हणाले.

त्यांनी असंही सांगितलं की, त्यांच्या मुलांनी इतर शाळेत शिक्षण घेतलं असलं तरी गावातील मुलांनाही तशाच सुविधा मिळाव्यात, हेच त्यांचं ध्येय आहे. "काहीजण समजतात की शाळेत शिकलेल्यांनाच बोलण्याचा अधिकार आहे. पण हा दृष्टिकोन चुकीचा आहे. खरा जिव्हाळा असता, तर आजवर शाळेत आवश्यक त्या सुविधा निर्माण झाल्या असत्या," अशी टीकाही त्यांनी केली.

"शाळेच्या इमारतीला रंग देऊन सगळं काही आलबेल असल्याचं दाखवणं चुकीचं आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, मुलांच्या गरजांची पूर्तता आणि सुविधा याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

गावातील शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढावी यासाठी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ग्रामपंचायतीचे सर्व कर माफ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. "या उपक्रमामागे केवळ शाळेचा पट वाढवण्याचा उद्देश होता, यात कोणतंही राजकारण नव्हतं," असं त्यांनी स्पष्ट केलं.

"गावाच्या हितासाठी काम करत असताना काहीजण मुद्दाम अडथळे निर्माण करत आहेत. परंतु त्याच्या अडथळ्यांनी आमचं काम थांबणार नाही. गावाने मला संधी दिली आहे, आणि या संधीचं सोने करून गावाचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामस्थांच्या सहकार्याने हा बदल निश्चित घडवून आणू," असा ठाम विश्वास सरपंच विराज धसाळ यांनी व्यक्त केला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत