(राहुरी : श्रेयस लोळगे) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण व उत्तम क्रीडा संधी देण्याच्या ध्यासातून १९७३ साल...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण व उत्तम क्रीडा संधी देण्याच्या ध्यासातून १९७३ साली स्थापन झालेली श्री शिवाजी विद्यानिकेतन, श्री शिवाजीनगर (राहुरी कारखाना) ही शाळा जरी आज अस्तित्वात नसली, तरी तिचे विद्यार्थी, तिच्या भूतकाळातील आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. याच जिवंत नात्याच्या साक्षीने येत्या १२ ऑक्टोबर २०२५ रोजी या शाळेचा भव्य स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दि राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून व शिवाजी शिक्षण मंडळाच्या अंतर्गत सहकाराच्या माध्यमातून श्री शिवाजी विद्यानिकेतन, श्री शिवाजीनगर या नावाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तसेच सभासदांच्या विद्यार्थ्यांना जगाच्या बरोबर (शैक्षणिक तथा क्रीडा क्षेत्रात) स्पर्धात्मक बनविण्याच्या हेतूने १९७३ साली सहकारातील आपल्या महान पूर्वजांनी दूरदृष्टी ठेवून या शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली.
४० वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या या शाळेने १९७३ पासून २०१४ पर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. नगर-मनमाड महामार्गाच्या अवघ्या ५०० मीटर अंतरावर, १०-१५ एकरात उभ्या असलेल्या या सुंदर वास्तूने शिक्षणाबरोबरच खेळ, शिस्त आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी रहिवासी सोयीसह एक अनोखा प्रयोग साकारला होता.
आज या वास्तूला भेट देण्यासाठी, आठवणींना उजाळा देण्यासाठी शेकडो माजी विद्यार्थी एकवटले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या १२ दिवसात महाराष्ट्र,मध्य प्रदेश,गुजरात या राज्यातले ३५ हून अधिक जिल्ह्यातून १००० हून अधिक विद्यार्थी एकत्र आले, तर ७०० पेक्षा अधिकांनी नावनोंदणी केली आहे. कार्यक्रमाचे आयोजन कोणत्याही राजकीय हेतूपासून दूर ठेवून, फक्त आपल्या शाळेच्या प्रेमाखातर केले जात आहे.
या स्नेहमेळाव्यात १९७३ ते २०१४ या दरम्यान शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. सिनिअर, जुनिअर, शिक्षक, कर्मचारी आणि व्यवस्थापन या सर्व घटकांनी उर्जा आणि उत्साहाने हा उपक्रम उभारला आहे. शेतकरी,कर्नल, सरकारी अधिकारी,डॉ, इंजिनीयर,व्यावसायिक यांसारखे शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र येत असून, हे आयोजन सर्वांसाठी एक भावनिक क्षण ठरणार आहे.
शाळेच्या स्थापनेपासून शेतकरी पालकांचा त्याग, शिक्षकांचा समर्पण, आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड आत्मविश्वास यामुळे ही शाळा एक काळात महाराष्ट्रात नावाजलेली होती. मात्र, दुर्दैवाने चुकीच्या धोरणांमुळे ही शाळा २०१४ साली बंद झाली. आज तिच्या आठवणींना पुन्हा जिवंत करण्याचा हा प्रयत्न आहे.
शाळा बंद झाली, पण नाती नाहीत... आठवणी आजही ताज्या आहेत!
या संकल्पनेतून होणारा हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही, तर आपल्या शाळेच्या परंपरेचा, संस्कारांचा आणि त्या पवित्र वास्तूच्या ऋणांची परतफेड करण्याचा प्रयत्न आहे.
स्थान – श्री शिवाजी विद्यानिकेतन, श्री शिवाजीनगर, राहुरी कारखाना
दिनांक – १२ ऑक्टोबर २०२५
वेळ – सकाळी ८:०० पासून संध्याकाळी ६.०० पर्यंत.
शाळेतील प्रत्येक बैच, प्रत्येक वर्ग, प्रत्येक आठवण या दिवशी पुन्हा एकदा सजीव होणार आहे.
वारकरी जसा आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूर जाण्यासाठी आतुर असतो ना तसाच काहीसा प्रकार शाळेचे माजी विद्यार्थी आपल्या पंढरीला भेटण्यासाठी बघण्यासाठी समजावून घेण्यासाठी आणि बालपणाच्या अविस्मरणीय आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी १२ ऑक्टोबर साठी आतुर आहेत.
शाळा जरी बंद झाली असली, तरी त्या आठवणींना मिटवणं अशक्य आहे... कारण ती होती, आहे, आणि राहील – आपली शाळा!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत