श्रीगोंदे(गणेश कांबळे) सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन 2024-25 या गळीत हंगामात गाळप केलेल्या ४ लाख ७६ हजार ५८९.२४६ मे. ...
श्रीगोंदे(गणेश कांबळे)
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन 2024-25 या गळीत हंगामात गाळप केलेल्या ४ लाख ७६ हजार ५८९.२४६ मे. टना करिता प्र. मे. टन रुपये २५० याप्रमाणे ऊस प्रोत्साहन अनुदान म्हणून सुमारे ११ कोटी ९२ लाख रुपये येत्या १३ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार तसेच कामगारांना ८-५०% बोनस दिवाळी पूर्वी देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 या गळीत हंगामात ४ लाख ७६ हजार ५८९-२४६ मे. टन उसाचे गाळप केले असून सदर उसाचे संपूर्ण पेमेंट एफ.आर.पी.सह प्र. मे.टन रुपये २८०० याप्रमाणे शेतकऱ्यांना आदा केलेले आहेत. तथापि गळीत हंगाम सुरू करताना व कारखान्याच्या वार्षिक सभेत जाहीर केल्याप्रमाणे सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणे करिता गळीतास आलेल्या उसाचे पेमेंट २५० रुपये प्र. मे. टन याप्रमाणे ११ कोटी ९२ लाख रुपये १३ ऑक्टोबरचे दरम्यान सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. असे सांगून नागवडे म्हणाले की, मागील गळीत हंगामात कारखान्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. उद्दिष्टा इतके गाळप झाले नाही. परंतु सभासद शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दांनुसार पेमेंट देणार आहोत. त्याचप्रमाणे कामगारांना ८.५०% प्रमाणे बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्यात येणार आहे.
तसेच प्रतिवर्षीप्रमाणे कारखान्यामार्फत सर्व सभासदांना दिवाळी करिता दहा किलो साखर प्रति किलो २० रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे कारखाना कार्यक्षेत्रातील कारखाना साईट , श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी, घारगाव व इनामगाव या सहा ठिकाणी दि. ५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर पर्यंत साखर वाटप चालू राहणार आहे. या कालावधीत सभासदांनी आपले आधार कार्ड घेऊन संबंधित साखर वाटप केंद्रातून आपली साखर घेऊन जावी. तदनंतर कोणाचीही तक्रार स्वीकारली जाणार नाही. तसेच नियमानुसार मयत सभासदांची साखर दिली जाणार नाही असे नागवडे यांनी सांगितले..
स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन अनेक अडचणींवर मात करून संचालक मंडळांनी एक विचाराने अत्यंत काटकसरीचा कारभार करून सभासद शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. नागवडे कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना रास्त व शाश्वत ऊस भाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे व भविष्यातही करणार आहे. नागवडे कारखान्याच्या विश्वासार्हतेला संचालक मंडळ कधीही बाधा येऊ देणार नाही. येणाऱ्या गळीत हंगामात सुद्धा नागवडे कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेने ऊस भावात मागे राहणार नाही. सभासद शेतकऱ्यांनी नागवडे कारखान्यासच ऊस देऊन जास्तीत जास्त गळीत करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत