(राहुरी : श्रेयस लोळगे) महाराष्ट्रातील नगरपरिषदांतील नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत आज जाहीर झाली असून, राहुरी शहरासाठी हे पद अनुसूचित जमाती...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
महाराष्ट्रातील नगरपरिषदांतील नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत आज जाहीर झाली असून, राहुरी शहरासाठी हे पद अनुसूचित जमाती (एसटी) पुरुष या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी राहिलेले पारंपरिक दावेदार बाजूला पडले असून, शहराच्या राजकीय वर्तुळात एक प्रकारची खळबळ निर्माण झाली आहे.
*पारंपरिक नेतृत्वाच्या आशा धुळीस, नव्या चेहऱ्यांची एन्ट्री*
आरक्षण जाहीर झाल्यानंतर, राहुरी शहरातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. दीर्घकाळापासून तयारीत असलेल्या अनेक दावेदारांची आशा एका झटक्यात संपुष्टात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. मात्र दुसरीकडे, अनुसूचित जमातीसाठी हे पद राखीव झाल्याने समाजातील सर्वसामान्य कुटुंबांतील उमेदवारांना संधी मिळणार असल्याचा आनंद व्यक्त करण्यात येतो आहे.
*चर्चेत असलेली नावे*-
सध्या शहरात माजी नगरसेवक कैलास माळी,माजी नगरसेवक सुनील नाना पवार, पै. महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, डॉ. अंगराज पवार, आणि गोरख नाना बर्डे ही नावे चर्चेत असून, या पैकी कोणी मैदानात उतरणार याकडे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या या नेत्यांची जनसंपर्क क्षमता आणि सामाजिक भान लक्षात घेता, निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
*कोणत्या चिन्हावर लढणार?*-
राहुरी शहरातील पारंपरिक राजकीय पक्ष — राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी या पक्षांचा प्रभाव असून, हे उमेदवार पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढणार की स्थानिक स्तरावरील जनसेवा मंडळ अथवा विकास मंडळ यांसारख्या प्रस्थापित गटांच्या माध्यमातून लढणार, यावरही उत्सुकतेचे वातावरण आहे.
*नागरिकांमध्ये चर्चेचा विषय*-
राहुरी शहरातील नागरिक सध्या सोशल मिडिया, चावडी व सार्वजनिक ठिकाणी याविषयी चर्चेत व्यस्त आहेत. नगराध्यक्षपदाच्या राजकीय समीकरणात अचानक झालेले हे बदल पुढील राजकारणाची दिशा निश्चित करणार असल्याने, स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी घडतील, अशी शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत