(राहुरी वेब प्रतिनिधी) उंबरे (ता. राहुरी) येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या रेशन वितरण व्यवस्थेत गंभीर अनियमितता समोर आली आहे. शासनाने ठ...
(राहुरी वेब प्रतिनिधी)
उंबरे (ता. राहुरी) येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या रेशन वितरण व्यवस्थेत गंभीर अनियमितता समोर आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात ऑनलाइन बिले काढली जात असताना देखील, प्रत्यक्षात रेशन कार्डधारकांना दरमहा २ ते ५ किलो धान्य कमी दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी संस्थेच्या वार्षिक साधारण सभेत तीव्र संताप व्यक्त केला. सभेच्या अध्यक्षस्थानी मा. संदीप सत्रे हे होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, पंचायत समिती सदस्य सुनील आडसुरे, संचालक डॉ. तनपुरे, भास्करराव ढोकणे, साहेबराव दुशिंग, सरपंच सुरेश साबळे, उपसरपंच संजय आडसुरे, व अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी स्पष्ट सांगितले की, उंबरे येथील धान्य दुकान काही महिन्यांपूर्वी काही अपरिहार्य कारणास्तव पिंपरी अवघड येथील दुकानदाराकडे हलविण्यात आले. त्या दुकानदाराकडून प्रत्येक महिन्याला शासन नियमानुसार बिले केली जात असली तरी प्रत्यक्षात धान्याचे मोजमाप कमी दिले जात आहे.
या गंभीर मुद्द्यावर सभेत चर्चा झाल्यानंतर सभाध्यक्षांनी संबंधित दुकानदाराला सभेत बोलविण्याचे आदेश दिले. परंतु दोन वेळा निरोप दिल्यानंतरही दुकानदाराने उपस्थित राहण्यास टाळाटाळ केली, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की, ओल्या दुष्काळाने आधीच सामान्य जनता त्रस्त आहे. त्यात अशा प्रकारच्या धान्य कपातीमुळे गोरगरिबांवर अन्याय होत आहे.
यासंदर्भात तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी त्वरित लक्ष घालून चौकशी करावी, तसेच सर्व रेशन कार्डधारकांना शासनाने मंजूर केलेले संपूर्ण गहू व तांदूळ मिळतील याची हमी द्यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत