“राहुरीत नव्या राजकीय समीकरणांची चाहूल; विकास मंडळाच्या हालचालींनी तापवले राजकीय वातावरण” - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

“राहुरीत नव्या राजकीय समीकरणांची चाहूल; विकास मंडळाच्या हालचालींनी तापवले राजकीय वातावरण”

(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून, विकास मंडळाच्या प्रभागनिहाय बैठकींना कार...

(राहुरी : श्रेयस लोळगे)

राहुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून, विकास मंडळाच्या प्रभागनिहाय बैठकींना कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आरक्षण सोडतीत राहुरी नगरपरिषदेला अनुसूचित जमाती (एसटी) पुरुष हे आरक्षण मिळाले आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राज असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात असून, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

२०२४ मध्ये विधानसभेला विकास मंडळाने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना साथ दिली होती. आता पुन्हा एकदा या निवडणुकीत विकास मंडळ प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत राहणार का?, की भारतीय जनता पार्टीसोबत युती करून मैदानात उतरणार, की स्वतंत्र पॅनल उभे करणार — याबाबत शहरात चर्चा रंगल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी विकास मंडळाकडे सक्षम उमेदवार असल्याचे बोलले जात असून, जर भाजपा-विकास मंडळ युती झाली तर कमळ फुलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मात्र, विकास मंडळ स्वतंत्र पॅनल उभे करणार का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात प्रभागनिहाय बैठकींना सुरूवात झाली आहे.

प्रभाग क्रमांक १ मधील येवले आ.विभागात माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी, प्रभाग क्रमांक १० मधील श्रीकृष्ण मंदिराजवळ बाबू उंडे यांच्या निवासस्थानी, तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील कृषी उत्पन्न बाजार समिती, केशर मंगल कार्यालय, नांदूर रोड येथे बापूसाहेब निवृत्ती वराळे यांच्या निवासस्थानी, तसेच प्रभाग क्रमांक ८ मध्ये बिरोबा नगर येथे या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक बैठकीत उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून निवडणूक रणनीती, जनसंपर्क मोहीम आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकींमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, विकास मंडळाची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा दाखवून देण्यात आली आहे.

शहरात सध्या “विकास मंडळ कोणासोबत?” या प्रश्नावर राजकीय चर्चा तापल्या असून, राहुरी नगरपरिषद निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव आणि शक्तीपरीक्षा रंगणार हे निश्चित झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत