(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरीत आज, बुधवार दुपारी दोन वाजता भारतीय जनता पार्टी व महायुतीतर्फे पांडुरंग मंगल कार्यालय येथे भव्य कार्यकर्ता मे...
राहुरीत आज, बुधवार दुपारी दोन वाजता भारतीय जनता पार्टी व महायुतीतर्फे पांडुरंग मंगल कार्यालय येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनानंतर आयोजित होणारा हा पहिलाच मोठा मेळावा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. युवा नेते तथा भाजप युवक जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत या मेळाव्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या मेळाव्यास राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, तसेच युवा नेते अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात पक्षाच्या रणनीतीसंदर्भात काही निर्णायक घोषणा होण्याची शक्यता असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राहुरी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर “उद्या आम्ही स्वयंस्फूर्तीने या मेळाव्याला उपस्थित राहणार हीच कर्डिले साहेबांना खरी श्रद्धांजली असेल; अक्षय दादाला कधीच उघडे पडू देणार नाही, हे दाखवून देऊ” अशा आशयाचे स्टेटस ठेवून वातावरण भारावून टाकले आहे.
राहुरीत आजच्या या ऐतिहासिक मेळाव्याला प्रचंड गर्दी होण्याची चिन्हे दिसत असून, तालुक्यातील भाजप- महायुती कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा शिखर बघायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत