(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी तालुका कलाकार मंच आणि केअर संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “गाणी, गप्पा आणि बरंच काही — शब्द सुर” हा आग...
राहुरी तालुका कलाकार मंच आणि केअर संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “गाणी, गप्पा आणि बरंच काही — शब्द सुर” हा आगळावेगळा सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम रविवार, दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत पांडुरंग लॉन्स, राहुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीष कुलकर्णी यांचे प्रेरणादायी शब्द आणि राहुरी तालुका कलाकार मंच प्रस्तुत सुरेल संगीताचा संगम. मुलींचे अपहरण थांबवणे आणि कुटुंब व्यवस्थेचे मूल्य जपणे या सामाजिक संदेशाला अधोरेखित करत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आनंद आणि जागृतीचा सुंदर संगम सादर होणार आहे.
कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला आणि मोफत असून, फक्त बैठक व्यवस्थेच्या नियोजनासाठी बुक माय शो ॲपवर निशुल्क नोंदणी करणे आवश्यक आहे.
👉 https://in.bookmyshow.com/events/shabdsur/ET00469866
दरम्यान, राहुरी तालुका कलाकार मंच व केअर संस्था यांच्या पुढाकाराने राहुरी पोलिस स्टेशन आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित “ऑपरेशन मुस्कान भाग २” अंतर्गत घेतलेल्या “खेळ सोशल मीडियाचा – प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा” या विषयावरील निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धातील विजेत्यांचा सन्मानदेखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
या सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ राहुरी तालुक्यातील जागरूक पालक व रसिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन समन्वय समिती, राहुरी तालुका कलाकार मंच व केअर एनजीओ पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत