(राहुरी : श्रेयस लोळगे) अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी वाढली असून अनेक भागांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्...
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी वाढली असून अनेक भागांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. भारतीय हवामान खात्याच्या नोंदींनुसार तापमानातील ही तीव्र घसरण चिंताजनक असून पुढील तीन दिवस थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे हवामान खात्याने ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सकाळी व संध्याकाळी दाट धुके आणि कडक वारे जाणवत असून सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तापमानात झालेल्या घटेमुळे शेतकऱ्यांसमोरही नवे आव्हान उभे राहिले असून पिकांवर थंडीचा प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी तज्ञांनी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, नागरिकांनी उबदार वस्त्रांचा वापर करावा, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील हवामानातील हा अचानक बदल पाहता पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत