लोणी(वेबटीम) लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने गोगलगाव येथे विकसित केलेला अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प राज्यातील विकसित होत असलेल्या गावांसाठी आदर्...
लोणी(वेबटीम)
लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने गोगलगाव येथे विकसित केलेला अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प राज्यातील विकसित होत असलेल्या गावांसाठी आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास जलसंपदा व पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, चेअरमन नंदू राठी, व्हा. चेअरमन सोपान शिरसाठ, प्रवरा बँकेचे व्हा. चेअरमन मच्छींद्र थेटे, सरपंच कल्पना मैड, दत्तात्रय राजभोज, भाऊसाहेब खाडे, अनिल विखे,इंजिनिअर प्रशांत कोठुळे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुमारे चार कोटी रुपयांच्या खर्चातून निर्माण झालेला हा ग्रामपंचायत स्तरावरील पहिलाच अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प आहे. ग्रामीण भागातील हा पहिला यशस्वी उपक्रम असल्याचे आणि इतर गावांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरेल, असे मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.
लोकसंख्या वाढीसोबत वाढणाऱ्या कचरा समस्येवर तोडगा म्हणून या प्रकल्पाची गरज अधोरेखित करताना मंत्री म्हणाले की, नव्या तंत्रज्ञानामुळे हा प्रकल्प अधिक सक्षम होईल यासाठी प्रयत्न सुरू राहतील. ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांच्या पुढाकाराने शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली असून त्यामुळेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्याचा अभिमान सर्वांना असल्याचेही त्यांनी सांगितले.
गावातील मटण मार्केट सर्व सुविधा पूर्ण करत असल्याची माहिती देत मंत्री विखे पाटील यांनी दोन एसटीपी प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी घनकचरा प्रकल्प उभारणीचा सविस्तर आढावा सादर केला. या प्रकल्पामुळे कोणत्याही गावाला त्रास होणार नसून कचरा संकलनापासून प्रक्रिया केंद्रापर्यंत सर्वांसाठी प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कचरापासून तयार होणारे खत स्थानिक शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत