पुणे(वेबटीम) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष व कार्यक्षम पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना भारत सरकारकडून “उल...
पुणे(वेबटीम)
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष व कार्यक्षम पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना भारत सरकारकडून “उल्लेखनीय सेवाबद्दल राष्ट्रपती पदक” जाहीर झाल्याने पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंद व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट, धाडसी व परिणामकारक कामगिरीची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेले अविनाश शिळीमकर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पोलीस दलात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तांबाड (गुंजल मावळ, ता. भोर, जि. पुणे) हे त्यांचे मूळ गाव असून ग्रामीण भागातून येत त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा व कठोर परिश्रमांच्या जोरावर पोलीस सेवेत उल्लेखनीय वाटचाल केली आहे.
सन १९९३ मध्ये PSI परीक्षेद्वारे पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई शहर, सातारा, नागपूर शहर गुन्हे शाखा, अहमदनगर विशेष शाखा तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा अशा विविध महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी प्रभावीपणे सेवा बजावली आहे. एलफंटा, वडाळा, एल.टी. मार्ग पोलीस स्टेशन येथे प्रथम नेमणूक झाल्यानंतर गुन्हे तपास, कायदा-सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कारवाई व विशेष मोहिमांमध्ये त्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी टोळीगुन्हे, घरफोड्या, दरोडे, खून, वाहनचोरी, शेतमाल चोरी तसेच अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवले. पेट्रोल पंप, बँका, कलेक्टर कार्यालय व दागिने दुकाने याठिकाणी घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सन २०२३ मध्ये नागपूर शहर पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखेत कार्यरत असताना मोठ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा उलगडा, गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई, आरोपींना अटक व मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करून त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले होते. त्यामुळे नागपूर शहर पोलीस दलातही त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली होती.
कोरोना महामारीच्या कठीण काळात नागरिकांसाठी विशेष सेवा, वैद्यकीय मदतीसाठी समन्वय, कायदा-सुव्यवस्था राखणे तसेच प्रशासनाला सहकार्य करत त्यांनी मानवतेचा आदर्श घालून दिला. निवडणूक काळात लोकसभा, विधानसभा, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यान उत्कृष्ट बंदोबस्त ठेवून शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यातही त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
अवैध दारू, मटका, जुगार व अमली पदार्थ विरोधात सातत्यपूर्ण व कठोर कारवाई करत त्यांनी समाजविघातक प्रवृत्तीवर आळा घालण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा अधिक भक्कम झाली असून नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास वाढण्यास मदत झाली आहे.
यापूर्वी सन २०२४ मध्ये त्यांना महाराष्ट्र राज्याचा पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या कर्तृत्वावर राष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्तबद्धता व उच्च कार्यक्षमतेचे प्रतीक असलेले पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर हे आज वरिष्ठ अधिकारी, सहकारी व नागरिकांमध्ये एक आदर्श व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी हा गौरवाचा क्षण मानला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत