राहुरी(वेबटीम) जिल्ह्यातील बारा नगरपालिकांमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला असून, यासाठी नूतन नगराध्यक्षांकडून पहिल्या...
राहुरी(वेबटीम)
जिल्ह्यातील बारा नगरपालिकांमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला असून, यासाठी नूतन नगराध्यक्षांकडून पहिल्या सर्वसाधारण सभांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये श्रीगोंदा नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा १२ जानेवारी, तर देवळाली प्रवरा, शिर्डी, राहाता व राहुरी नगरपालिकांची पहिली सभा १३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभांमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड तसेच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे.
बारा पालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, शिर्डी, श्रीरामपूर, राहुरी, जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिका तसेच नेवासा नगरपंचायत अशा एकूण बारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सर्व नगरपालिकांवर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले असून, आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी पहिली सर्वसाधारण सभा घेण्याचा अधिकार नूतन नगराध्यक्षांना आहे.
श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सुनिता संतोष खेतमाळीस यांनी दि. १२ जानेवारी २०२६ रोजी पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पहिली सर्वसाधारण सभा बोलावली आहे.
शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्री विष्णू थोरात यांनी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी शिर्डी पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन किसनराव गाडेकर यांनी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पहिली सर्वसाधारण सभा बोलावली आहे.
राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी देखील दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना वेग या पाचही नगरपालिकांमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. पहिल्याच सभेत सत्ता-संतुलन कसे घडते, यावर आगामी कालावधीतील नगरपालिकेची दिशा ठरणार असल्याने या निवडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत