राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कनगरसह 12 गावांतील पशुपालकांसाठी अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने पशुस...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कनगरसह 12 गावांतील पशुपालकांसाठी अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने पशुसेवेसाठी फिरते पशु चिकित्सालय, म्हणजेच मोबाईल व्हॅन सुरू करण्यात आली आहे.
कारगिल ग्रुप कंपनी आणि सिजेंटा फाउंडेशन इंडिया यांच्या सीएसआर फंडातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे व ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोबाईल व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले.
या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारातच आजारी पशूंवर उपचार, रोगप्रतिबंधक लसीकरण, पशु आहार व आरोग्याबाबत तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून मार्गदर्शन, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पशुपालकांना अत्यावश्यक सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे.
या सेवेसाठी 83 90 80 70 60 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून ज्या शेतकऱ्यांच्या गोठ्यातील गाई, शेळ्या, मेंढ्या किंवा इतर पशु आजारी असतील किंवा लसीकरणाची गरज असेल त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास मोबाईल व्हॅन व त्यातील तज्ञ डॉक्टर थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन उपचार करणार आहेत.
ही सेवा सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि अक्षय कर्डिले यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी कारगिल ग्रुप व सिजेंटा कंपनीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर छत्रपती आचने आणि डॉक्टर संजय शिरसाठ यांनी या सेवेची सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी उपसरपंच बाळासाहेब गाढे, सोसायटीचे चेअरमन अन्सार शेख, व्हाईस चेअरमन भाऊसाहेब सिताराम घाडगे, मोहम्मद इनामदार, सुभाष नालकर, शंकर जाधव, विष्णू घाडगे यांच्यासह अनेक दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत