देवळाली प्रवरा(वेबटीम) शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि देवळाली प्रवरा शहर ‘कचरा मुक्त’ करण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेने कठोर निर्णय घेत...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि देवळाली प्रवरा शहर ‘कचरा मुक्त’ करण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेने कठोर निर्णय घेतले आहेत. मंगळवारी (दि. ११ फेब्रुवारी २०२६) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सिंगल युज प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात स्पॉट फाईन आकारण्याचे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.
डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा वाढता धोका लक्षात घेऊन तसेच स्वच्छ भारत अभियानात शहराचे मानांकन उंचावण्यासाठी प्रशासनाने हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे सांगण्यात आले.
*प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी*
केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांनुसार सिंगल युज प्लास्टिकवर पूर्ण बंदी लागू आहे. प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक चमचे, थर्माकोल साहित्य तसेच १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे बॅनर्स वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.
*उघड्यावर कचरा टाकल्यास स्पॉट फाईन*
शहरातील रस्ते व गटारांमध्ये कचरा टाकण्याच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य विभागाचे पथक नियमित गस्त घालणार आहे. नियमभंग करताना आढळल्यास जागीच दंड आकारण्यात येईल.
सर्वसामान्य नागरिक : ५०० रुपये
व्यावसायिक/दुकानदार : १,००० रुपये
हॉटेल/रेस्टॉरंट : ५,००० रुपये
पुन्हा गुन्हा केल्यास दंड दुप्पट
देवळाली प्रवरा शहराला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पुरस्कार मिळाल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा तसेच ओला-सुका कचरा घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील व नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत