देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील टाकळीमिया रोड परिसरात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटर्स, केबल व स्टार्टर चोरीच्य...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील टाकळीमिया रोड परिसरात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटर्स, केबल व स्टार्टर चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या प्रकारांमुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
टाकळीमिया रोड वस्तीवरील कनिफनाथ चौक, शिव रस्ता, खुरुद मळा, कदम वस्ती, कडू वस्ती, कुरणपट्टी तसेच शिंदे मळा परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
गेल्या दोन दिवसांपूर्वी या भागातील शेतकऱ्यांच्या विद्युत केबल चोरीची घटना घडली. यावेळी नगरसेवक सौरभ मुसमाडे व स्थानिक शेतकऱ्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरट्यांनी चोरी केलेल्या केबलच्या गोण्या टाकून घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी प्रभाकर सहादु मुसमाडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
टाकळीमिया रोड परिसरात वाढत्या विद्युत साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक सौरभ मुसमाडे यांनी पोलिस प्रशासनाकडे तात्काळ ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत