देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषदेतील वाढीव पाणीपट्टी दर, आठवडे बाजार कर वसुली, अतिक्रमण कारवाईतील भेदभाव तसेच सैनिकाच्या पत्...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषदेतील वाढीव पाणीपट्टी दर, आठवडे बाजार कर वसुली, अतिक्रमण कारवाईतील भेदभाव तसेच सैनिकाच्या पत्नीच्या कथित छळवणुकीसंदर्भातील विविध प्रश्न घेऊन विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने वाढीव पाणीपट्टी दरासंदर्भातील नगरपरिषदेचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. नागरिकांनी यापूर्वी नगरपालिकेसमोर आंदोलन करून या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करत, हा ठराव अधिकारात घेऊन रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, नगरपरिषदेने राजकीय हस्तक्षेपातून ठराविक लोकांवरच अतिक्रमण कारवाई करत पुनर्वसन न करता अन्याय केल्याचा मुद्दाही शिष्टमंडळाने उपस्थित केला. आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांकडून वाढीव कर वसुली आणि इतर करप्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली.
दरम्यान, सैनिकाची पत्नी पूनम कदम यांची कथित कागदोपत्री छळवणूक आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागण्यात आला. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या भूमिकेची चौकशी करून संबंधित प्रकरणात पोलिसांना आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
“प्रशासनाने या प्रश्नांकडे तातडीने लक्ष न दिल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल,” असा इशाराही शिष्टमंडळाने दिला.
यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते तुकाराम उर्फ दासू पठारे, नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात, नगरसेवक शरदभाऊ वाळुंज, पूनमताई कदम, वैभव गिरमे, दत्ता कडू पाटील, अॅड. कुमार भिंगारे, अनिल चव्हाण, वसंत कदम, प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब दुस, सुनील वाळुंज, गणेश भालके, स्नेहलताई दिवे, माधुरी कदम, हिराबाई कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत