अहिल्यानगर(वेबटीम) स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी वाहिले. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत त्या...
अहिल्यानगर(वेबटीम)
स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी वाहिले. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम केले. लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यासाठी झटणारे लोकनेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर, वृक्ष वाटप आणि वृक्षसंवर्धन संदेश कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श संदेश देण्यात आला आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सुरू केलेल्या लोकहिताच्या कार्याचा वारसा आमदार अक्षय कर्डिले यांनी अधिक जोमाने पुढे नेऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर व वृक्ष वाटप तसेच वृक्षसंवर्धन संदेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार अक्षय कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार काशिनाथ दाते सर, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, रावसाहेब कर्डिले, दादाभाऊ चितळकर, बाजीराव गवारे, विनायक देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी १ जून रोजी मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन करत असे. त्यावेळी ते हसत सांगायचे की, “हा सरकारी वाढदिवस आहे, मी तो साजरा करत नाही.” मात्र मी त्यांना न चुकता फोन करून शुभेच्छा देत असे. माणसातील माणूस, जिवाभावाचा सहकारी आणि लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. लोकांना जोडून ठेवण्याची विलक्षण क्षमता त्यांच्यामध्ये होती. जनतेच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत असत. शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा जनाधार मिळविण्यासाठी आमदार अक्षय कर्डिले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करावे. त्यांचे स्वप्न पूर्ण करत लोकांचा विश्वास संपादन करावा, असे ते म्हणाले.
आमदार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझ्या वडिलांची जयंती त्यांच्या अनुपस्थितीत एवढ्या लवकर साजरी करण्याची वेळ येईल असे कधीच वाटले नव्हते. माझ्या वडिलांना वाढदिवस साजरा करायला कधीच आवडत नव्हते. मी आग्रहाने केक घेऊन येत असे, पण त्यांना केक कापणेही पसंत नव्हते. त्यांना फक्त जनतेमध्ये राहून लोकांची कामे करायला आवडायची. जनतेशी जोडलेले राहणे हाच त्यांचा खरा उत्सव होता. त्यामुळे त्यांना आवडणारेच जनसेवेचे कार्य मी यापुढेही सातत्याने करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सरपंच पदापासून ते मंत्रिपद, तसेच जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ते एकमेव नेते होते. नगर जिल्ह्याच्या राजकारणात शिवाजीराव कर्डिले यांचे नाव वगळून चर्चा होऊच शकत नाही. कोणत्याही राजकीय वारशाशिवाय त्यांनी तब्बल सहा वेळा आमदारपद भूषविले आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. विधानसभेत कमी बोलूनही विकासकामांसाठी मोठा निधी आणणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. आम्हाला पूर्वी वाटत होते की विधानसभेत बोलल्याशिवाय विकासकामे होत नाहीत, मात्र शिवाजीराव कर्डिले यांनी कामातूनच आपली ताकद दाखवून दिली, असे त्या म्हणाल्या.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, सामान्य जनतेशी नाळ जोडणारे, लोकांच्या भावना जाणणारे आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेते म्हणून शिवाजीराव कर्डिले यांची कायम ओळख राहील. त्यांनी जनतेसाठी केलेले कार्य आणि जपलेली माणुसकी आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे उपसभापती रभाजी सुळ यांनी केले. तर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. तसेच वृक्ष वाटप आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला कार्यकर्ते, नागरिक आणि पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत