देवळाली प्रवरा माहेर असलेल्या विवाहितेची दौंड परिसरात आत्महत्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा माहेर असलेल्या विवाहितेची दौंड परिसरात आत्महत्या

  पुणे(वेबटीम) सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून देवळाली प्रवरा माहेर असलेल्या  एका २५ वर्षीय विवाहितेने ...

 पुणे(वेबटीम)



सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून देवळाली प्रवरा माहेर असलेल्या  एका २५ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील डाळिंब येथे घडली आहे. 


वैष्णवी अजिंक्य कांबळे (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीसह ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


 याप्रकरणी मृत वैष्णवीची आई श्रीमती आशा संतोष साबळे (वय ४५, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी यवत पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.


 मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली प्रवरा येथील वैष्णवी हिचा विवाह १५ जून २०२२ रोजी डाळिंब (ता. दौंड, जि. पुणे) येथील अजिंक्य भाऊसाहेब कांबळे याच्याशी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर काही दिवस संसार सुरळीत चालला. मात्र, त्यानंतर पती अजिंक्य याला दारूचे व्यसन जडले. "तुझ्या आईने लग्नात काही दिले नाही, लग्नाचा सगळा खर्च आम्हीच केला आहे," असे टोमणे मारत पतीने वैष्णवीला मारहाण व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिचे सासरे भाऊसाहेब कांबळे हे देखील तिच्यावर वाईट नजर ठेवून मानसिक त्रास देत असत, वैष्णवीने या छळाबाबत आपल्या आईला फोन करून अनेकदा सांगितले होते. मात्र, मुलीचा संसार मोडू नये म्हणून आईने नातेवाईकांच्या मध्यस्थीने अनेकदा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी (दि. ८ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वैष्णवीने तिच्या आईला फोन करून सासरच्या छळाची आपबीती सांगितली होती. रविवारी तिने सासू-सासरे आणि पतीकडून होणाऱ्या त्रासाबाबत जावेला सांगितले होते. याचा राग मनात धरून पती, सासू, सासरे, दीर आणि आतेभाऊ यांनी मिळून तिला इतकी बेदम मारहाण केली की ती बेशुद्ध पडली होती. तरीही तिला दवाखान्यात नेण्यात आले नव्हते. यापूर्वीही मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या काही व्यक्तींनी वैष्णवीला कारण नसताना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


 मंगळवारी (दि. ९ जून) सकाळी साडेआठच्या सुमारास आई आशा साबळे या मुलीची भेट घेण्यासाठी देवळाली प्रवरा येथील बसस्थानकावर आल्या होत्या. त्याच वेळी जावई अजिंक्य कांबळे याचा त्यांना फोन आला. तिने फाशी घेतल्याचे पतीने फोनवर सांगितले, घाबरलेल्या अवस्थेत आईने तात्काळ पुण्याच्या दिशेने धाव घेतली. प्रवासात असतानाच वैष्णवीला उपचारासाठी यवत येथील शासकीय रुग्णालयात आणल्याचे त्यांना समजले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वैष्णवीचा मृत्यू झाला होता. मयत वैष्णवीला उपाशीपोटी ठेवून, शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यातील संशयित आरोपी अजिंक्य भाऊसाहेब कांबळे (पती), भाऊसाहेब कांबळे (सासरे), लक्ष्मीबाई कांबळे (सासु), शेखर भोसले (पतीचा आतेभाऊ), स्वप्नील भाऊसाहेब कांबळे (दीर, सर्व रा. डाळिंब, ता. दौंड), कदम (पूर्ण नाव माहीत नाही, सासऱ्यांचा मित्र, रा. उरळीकांचन) यवत पोलीस ठाण्यात या सर्वांविरुद्ध गु.र.नं. ५६५/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ११५ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती व दीर यांना अटक केल्याची माहिती मिळत असून पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत