देवळाली प्रवराच्या दोन युवा उद्योजकांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार गौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या दोन युवा उद्योजकांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार गौरव

देवळाली प्रवरा(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेतकरी कुटुंबातील युवा उद्योजक प्रसाद आप्पासाहेब देशमुख आणि सौरभ राजेंद्र कद...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेतकरी कुटुंबातील युवा उद्योजक प्रसाद आप्पासाहेब देशमुख आणि सौरभ राजेंद्र कदम यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि नाविन्यपूर्ण विचारांच्या बळावर कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत सारथी संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा २६ जून रोजी पुणे येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे.



देवळाली प्रवरा येथील प्रसाद देशमुख आणि सौरभ कदम यांनी स्थापन केलेल्या एस.पी. ॲग्रो या उपक्रमाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात अनेक अभिनव प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवाढीसाठी संशोधनाधारित उपाययोजना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि कृषी व्यवसायाला चालना देणारे विविध उपक्रम यामुळे त्यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

एस.पी. ॲग्रोच्या माध्यमातून शेतीला उद्योगाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगारनिर्मितीचे कामही मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. त्यांच्या उपक्रमांमुळे अनेक युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, शेतीकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे.


कृषी क्षेत्रातील नावीन्य, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधत त्यांनी केलेल्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सारथी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव होणार आहे. या सन्मानामुळे देवळाली प्रवरा, राहुरी तालुका आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.


या निवडीची माहिती समोर आल्यानंतर परिसरातील शेतकरी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून प्रसाद देशमुख व सौरभ कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत