देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील शासकीय जमिनींवरील निवासी अतिक्रमणे नियमित करून गरीब व गरजू नागरिकांना त्यांच्या हक्क...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील शासकीय जमिनींवरील निवासी अतिक्रमणे नियमित करून गरीब व गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे तसेच मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम, मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, उपनगराध्यक्ष बेबीताई बर्डे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. २५ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णय (जीआर क्रमांक : जमीन-२०२६/प्र.क्र.२०/जमीन-१) संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. या शासन निर्णयानुसार शासकीय जमिनींवरील निवासी स्वरूपातील अतिक्रमणे विशिष्ट अटी व निकषांच्या अधीन राहून नियमित करण्याची तरतूद करण्यात आली असून, त्याचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, कागदपत्रे आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत नगरपरिषद हद्दीतील निवासी अतिक्रमणांची सद्यस्थिती, पात्र लाभार्थ्यांची निवड, नियमितीकरणासाठी आवश्यक निकष तसेच अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना त्यांच्या निवासस्थानाचा कायदेशीर हक्क मिळावा आणि त्यांचा घरकुलाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने कार्य करण्याची भूमिका मांडली.
नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम यांनी शासनाच्या धोरणांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले. नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी असलेल्या निवासाच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
याच बैठकीत मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी लोकप्रतिनिधींना मतदार नोंदणी, नावांतील दुरुस्ती, नवमतदारांचा समावेश तसेच पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत सुनिश्चित करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. मतदार यादी अचूक व अद्ययावत राहण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीदरम्यान नगरसेवक व नगरसेविकांनी विविध प्रश्न उपस्थित करत नागरिकांच्या हिताशी संबंधित विषयांवर चर्चा केली. निवासी अतिक्रमणे नियमितीकरण आणि मतदार यादी पुनर्निरीक्षण या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये सकारात्मक संवाद झाल्याचे दिसून आले.
या बैठकीस उपनगराध्यक्ष बेबीताई बर्डे, मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत नागरिकांच्या हिताच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत