देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आराध्यदैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी यांच्या पायी दिंडी सोहळ्य...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आराध्यदैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी होणार असून, यंदा दिंडीचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.
समस्त शहरवासीयांच्या प्रेरणेने व भक्तपरिवाराच्या सहकार्याने ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली तसेच बाबा महाराज मोरे, सुभाष महाराज विधाटे, भगवान महाराज मोरे (देहूकर), सोमनाथ महाराज माने आणि किशोर महाराज निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता नगराध्यक्ष सत्यजित कदम व प्रिती कदम यांच्या हस्ते पालखी पूजन होईल. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
रविवार, १२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता राहुरी शहरात माजी खासदार बापूसाहेब तनपुरे व डॉ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते पालखी पूजन झाल्यानंतर दिंडी पुढील प्रवासास मार्गस्थ होईल.
दिंडीदरम्यान दररोज सकाळी ५ ते ६ या वेळेत काकडा व भजन, सकाळी ७ वाजता आरती, प्रवासात अखंड भजन सेवा, सकाळी ११ ते १२ प्रवचन, त्यानंतर भोजन व विश्रांती, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व आरती, तर रात्री ७ ते ८ किर्तन आणि भोजन असा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंढरपूर येथे दिंडीचे वास्तव्य श्री त्र्यंबकराज स्वामी वारकरी सेवाश्रम (भटुंबरे) येथे राहणार आहे. २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दिंडी प्रदक्षिणा होणार असून, २६ जुलै रोजी सकाळी महाप्रसादानंतर दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होईल.
दिंडी सोहळ्याची सांगता गुरुवार, ३० जुलै रोजी देवळाली प्रवरा येथील सहारा लॉन्स नियोजित श्री त्र्यंबकराज स्वामी वारकरी शिक्षण संस्था तथा धर्मसंस्कार केंद्राशेजारी, श्रीरामपूर रस्ता येथे सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, संतपूजन शिलाताई व सोन्याबापू जाधव यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या रौप्यमहोत्सवी दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक ह.भ.प. सिताराम ढुस यांच्या मार्गदर्शनाखाली श्री त्र्यंबकराज स्वामी शिक्षण व वारकरी संस्था, देवळाली प्रवरा तसेच व्यवस्थापन समिती परिश्रम घेत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत