राहुरी/वेबटीम:- तालुक्यातील तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, केंदळ बु. तसेच परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी व प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी...
राहुरी/वेबटीम:-
तालुक्यातील तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, केंदळ बु. तसेच परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी व प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून या मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या बससेवेसाठी विधान परिषद सदस्य आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या संदर्भात प्राजक्त तनपुरे यांनी विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अहिल्यानगर यांना पत्र देऊन राहुरी–मांजरी मुक्कामी बस केंदळ–शिलेगाव–कोंढवड–तांदुळवाडी मार्गे सुरू करण्याची, तसेच राहुरी–राहुरी रेल्वे स्टेशन–तांदुळवाडी–कोंढवड–शिलेगाव–केंदळ–आरडगाव व परतीच्या मार्गावर सकाळी सात वाजता बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
या मार्गावरील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांना राहुरी शहर व रेल्वे स्टेशन येथे ये-जा करण्यासाठी बससेवेचा मोठा अभाव जाणवत होता. यामुळे शिक्षण, नोकरी आणि दैनंदिन प्रवासासाठी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या पाठपुराव्यामुळे आता तांदुळवाडी, कोंढवड, शिलेगाव, केंदळ बु. आणि परिसरातील नागरिकांना नियमित बससेवेचा लाभ मिळणार असून विद्यार्थी व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. स्थानिक नागरिकांनी बससेवा सुरू झाल्याबद्दल प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत