देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील मुळा धरणात सुमारे पाच महिन्यांपूर्वी चेन ब्लॉक तुटल्याने पडलेला ४० ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील मुळा धरणात सुमारे पाच महिन्यांपूर्वी चेन ब्लॉक तुटल्याने पडलेला ४० एचपी क्षमतेचा मोटर पंप व त्यास जोडलेले पाच जी.आय. पाईप अखेर विशेष तांत्रिक मोहिमेद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात नगरपरिषदेला यश आले आहे.
पाणी उपसा यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामादरम्यान हा मोटर पंप धरणात पडला होता. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी अधिक असल्याने पंप बाहेर काढणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून उशिरा सुरू होण्याची व पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी खाली जाईल आणि मोटर पंप बाहेर काढणे सोयीचे होईल, असा तांत्रिक अंदाज नगरपरिषदेने व्यक्त केला होता. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची आवक वेगाने वाढू लागली. त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यापूर्वीच मोटर पंप बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी नगरपरिषदेने विशेष तांत्रिक मोहीम राबविली. धरणातील खोल पाणी, चिखलयुक्त तळ, मोटर पंपाचे मोठे वजन आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे हे काम अत्यंत आव्हानात्मक ठरले. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्रेन, स्टील वायर रोप, विशेष रस्से आणि आवश्यक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने अनेक तास अथक प्रयत्न करून मोटर पंप व त्यास जोडलेले जी.आय. पाईप सुरक्षितपणे धरणाबाहेर काढले.
दरम्यान, मोटर पंप धरणात पडल्यापासून शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने पर्यायी मोटर पंप कार्यान्वित ठेवून अखंड पाणीपुरवठा सुरू ठेवला. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा कोणताही त्रास सहन करावा लागला नाही.
नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले, "शहरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ नये, ही आमची सर्वोच्च प्राथमिकता होती. त्यामुळे पर्यायी मोटर पंपाद्वारे अखंड पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला. धरणातून बाहेर काढलेल्या मोटर पंपाची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल. त्यानंतर हा मोटर पंप राखीव स्वरूपात ठेवण्यात येणार असून भविष्यात कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास पाणीपुरवठा यंत्रणेवर त्याचा परिणाम होणार नाही."
या मोहिमेदरम्यान नगराध्यक्ष सत्यजित कदम, नगरसेवक तथा भाजप गटनेते प्रकाश संसारे आणि नगरसेवक सचिन शेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यशस्वीपणे मोहीम पूर्ण केल्याबद्दल नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी आणि प्रत्यक्ष कामात सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत