नेवासा (प्रतिनिधी) नेवासा फाटा येथे भरदिवसा एका १९ वर्षीय युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपींना नेवासा पोलिसांनी अवघ्या...
नेवासा (प्रतिनिधी)
नेवासा फाटा येथे भरदिवसा एका १९ वर्षीय युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपींना नेवासा पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली. गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि कोयते जप्त करण्यात आले असून, आरोपींची घटनास्थळी धिंड काढत पोलिसांनी गुन्हेगारांना कडक इशारा दिला.
शुक्रवारी (दि. ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील पूजा फास्टसमोर ही घटना घडली. जखमी साहिल आसाराम खाजेकर (वय १९, रा. नेवासा खुर्द) हा आजीला भेटण्यासाठी नेवासा फाटा येथे आला असताना, स्विफ्ट कारमधून आलेल्या रवींद्र बाळासाहेब शिंदे, रोहित अंकुश बर्डे, सोमनाथ सुरेश चांदणे आणि संदेश संजय गायकवाड (सर्व रा. नेवासा बु.) यांनी जुन्या वादातून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, उपनिरीक्षक विकास पाटील व डीबी पथकाने तातडीने तपास सुरू केला. अवघ्या अर्ध्या तासात चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि कोयतेही जप्त करण्यात आले. घटनेनंतर शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नेवासा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणाले
"कोणीही कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर तो खपवून घेतला जाणार नाही. तालुक्यातील गुन्हेगारांची माहिती घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कठोर आणि योग्य कारवाई करण्यात येईल."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत