श्रीरामपूर (वेबटीम) खेळ हे केवळ हार-जीत किंवा पदकांपुरते मर्यादित नसून, ते आयुष्य जगण्याची शिस्त, संघभावना आणि संकटातून पुन्हा उभे राहण्याच...
श्रीरामपूर (वेबटीम)
खेळ हे केवळ हार-जीत किंवा पदकांपुरते मर्यादित नसून, ते आयुष्य जगण्याची शिस्त, संघभावना आणि संकटातून पुन्हा उभे राहण्याची जिद्द शिकवतात, असे प्रतिपादन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी केले.
बेलापूर येथील केशव गोविंद बन येथे महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन असोसिएशन आणि हौशी बॉल बॅडमिंटन असोसिएशन, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७० वी महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन महिला स्पर्धा २०२६-२७ उत्साहात सुरू झाली. स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या हस्ते, तर राहुरी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती गोरक्षनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे, असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. पी. के. पटेल, राज्य सचिव अतुल इंगळे, कार्याध्यक्ष धुंडीराज गोसावी, सहसचिव डॉ. हरीश काळे, उपाध्यक्ष ऋषिकांत पापडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ज्ञानेश्वर कोळसे म्हणाले, खेळ कोणताही असो, तो खिलाडूवृत्तीने खेळला पाहिजे. विजय मिळाल्यास नम्र राहावे, तर पराभवातून शिकून पुढील वेळी अधिक ताकदीने मैदानात उतरावे. खेळात कोणीही पराभूत होत नाही; एकतर माणूस जिंकतो किंवा शिकतो, असे त्यांनी सांगितले.
डॉ. पी. के. पटेल, ऋषिकांत पापडकर आणि प्रवीण गुलाटी यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक जिल्हा सचिव नितीन घोलप यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष गणेश विघे यांनी केले, तर आभार सल्लागार प्रशांत होन यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संजय कंगले, मनोज तांबे, दादासाहेब वाघ, वैशाली कदम, प्रसाद शिंदे, योगेश पवार, विजय पुजारी, बाबासाहेब जाधव यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत