देवळाली प्रवरा/वेबटीम:- येथील देठे वस्ती परिसरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, सांडपाणी परिसरातच सोडले जात असल्याने दुर्गंधी व अस्व...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
येथील देठे वस्ती परिसरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, सांडपाणी परिसरातच सोडले जात असल्याने दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक तसेच लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे थेट देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
देठे वस्ती परिसरातील सांडपाणी योग्य पद्धतीने वाहून नेण्याची व्यवस्था नसल्याने ते आजूबाजूच्या परिसरात साचत आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी निर्माण होत असून, अस्वच्छतेतही वाढ झाली आहे. विशेषतः लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, सांडपाणी सोडण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करावी तसेच सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आज शाळकरी विद्यार्थ्यांनी याबाबत पालिकेस निवेदन दिले. यावेळी युवराज देठे, साईराज देठे, अर्जुन देठे, गणेश देठे, चेतन देठे, शिवम देठे, साई गडाख शाळकरी विद्यार्थ्यांसह नगरसेवक दासू पठारे, मनीष देठे आदी उपस्थित होते.
दरम्यान, या समस्येवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत