ताहाराबादच्या बेलकरवाडीत आजपासून अखंड हरिनाम सप्ताह; नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ताहाराबादच्या बेलकरवाडीत आजपासून अखंड हरिनाम सप्ताह; नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी

ताहाराबाद (वेबटीम)  श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील बेलकरवाडी दक्षिणमुखी हनुमान मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व ...

ताहाराबाद (वेबटीम)



 श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील बेलकरवाडी दक्षिणमुखी हनुमान मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व भक्तविजय पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १८ ऑगस्ट ते सोमवार दि. २५ ऑगस्टदरम्यान हा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

बेलकरवाडी ग्रामस्थ व तरुण मंडळाच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या भव्य दक्षिणमुखी हनुमान मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मासिक पौर्णिमा उत्सव, वार्षिक सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण यांसह विविध धार्मिक उपक्रम येथे नियमितपणे पार पडतात. छोटीशी वस्ती असलेल्या बेलकरवाडीने ताहाराबाद परिसरात मोठमोठे धार्मिक सोहळे आयोजित करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वात आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा होणार आहे. ज्ञानदानासोबतच अन्नदानाचाही मोठा यज्ञ या निमित्ताने होणार असून भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी उपलब्ध होणार आहे.

सप्ताहाची सुरुवात मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी होणार असून दि. २५ ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताह काळात दररोज काकडा भजन, अभिषेक, आरती, भक्तविजय पारायण, नैवेद्य, हरिपाठ, कीर्तन तसेच रात्री जागर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात अशोक महाराज शिंदे, नाना महाराज गागरे, तुकाराम महाराज बेलकर, लक्ष्मण महाराज पांचाळ, पांडुरंग महाराज पठारे, अर्जुन महाराज तनपुरे आणि संदीप महाराज जाधव यांची कीर्तनसेवा होणार आहे. तर सप्ताहाच्या सांगतेनिमित्त बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.


श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ दाटलेली असताना संत महिपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भक्तविजय पारायण व कीर्तनसेवेचा सोहळा रंगणार आहे. यासोबतच भाविकांसाठी इच्छाभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली असून, ही या सोहळ्याची विशेष आकर्षणाची बाब ठरणार आहे.श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थान, श्रीक्षेत्र बेलकरवाडी (ताहाराबाद) हे नोंदणीकृत देवस्थान असून देवस्थानच्या माध्यमातून मंडप, स्वयंपाकाची भांडी, साऊंड सिस्टिम तसेच बोलेरो वाहन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधा परिसरातील नागरिकांना अल्पदरात भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जात असून त्यातून देवस्थानास उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे.

या ज्ञानदान व अन्नदानाच्या भक्तिमय सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन बेलकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

— बाळासाहेब महाराज बेलकर, अध्यक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत