सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यास सहा महिने सक्तमजुरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यास सहा महिने सक्तमजुरी

अहिल्यानगर (वेबटीम) महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की, मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुंजाळ (ता. राहुरी) ये...

अहिल्यानगर (वेबटीम)



महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की, मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुंजाळ (ता. राहुरी) येथील बाबासाहेब एकनाथ चेंडवाल (वय ५०) यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.

या प्रकरणाची घटना ७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गुंजाळ येथे घडली. महावितरणचे अभियंता मंगेश तानाजी गांगुर्डे हे ‘एक गाव, एक दिवस’ अभियानांतर्गत गावात वीज बिल भरण्याबाबत जनजागृती करत होते. यावेळी भास्कर खंडेराव तांबे यांच्या अधिकृत वीज जोडणीच्या सर्व्हिस वायरला अनधिकृतपणे जोड देऊन काळ्या रंगाच्या केबलद्वारे वीज नेल्याचे निदर्शनास आले.

महावितरणचे कर्मचारी अनधिकृत जोडणीची वायर काढत असताना आरोपी बाबासाहेब चेंडवाल तेथे आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना केबल खाली टाकण्यास सांगत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी गांगुर्डे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत धक्काबुक्की व मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर राहुरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे फिर्यादी मंगेश गांगुर्डे, यशवंत भागा घाणे, प्रविण भाउसाहेब काळे आणि तपासी अधिकारी गणेश किसन शेळके या चार साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.

सरकार पक्षाच्या पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३५३ अंतर्गत सहा महिन्यांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्याचे काम जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल डी. ढगे यांनी पाहिले. पैरवी अधिकारी पोलीस नाईक महेश जोशी आणि महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सीमा राजपूत यांनी सहकार्य केले. गुन्ह्याचा तपास राहुरीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक तथा सध्या ठाणे शहर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले गणेश किसन शेळके यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत