राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून महिन्याला पाच टक्के परतावा आणि तब्बल एक लाख रुपये महिन्याला मिळवून देण्याचे ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून महिन्याला पाच टक्के परतावा आणि तब्बल एक लाख रुपये महिन्याला मिळवून देण्याचे आमिष दाखवून राहुरी फॅक्टरी येथील एका इंजिनिअरची तब्बल २१ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या मध्यस्थीमुळे संबंधित इंजिनिअरने आरोपीवर विश्वास ठेवला. पैसे घेतल्यानंतर संबंधित लॉन्ड्रीचालक कुटुंबासह फरार झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी अजिंक्य किरण चव्हाण (वय ३०, व्यवसाय इंजिनिअर, रा. राहुरी फॅक्टरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष विनायक भोसले (रा. चिंचविहीरे, ता. राहुरी) याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, राहुरी फॅक्टरी येथील डॉ. हर्षद ललित चोरडिया हे चव्हाण यांचे मित्र असून ते लहान मुलांचे रुग्णालय चालवतात. एका प्रसंगी डॉक्टरांच्या राहुरी येथील घरी संतोष भोसले याच्याशी चव्हाण यांची ओळख झाली. भोसले याचे राहुरी फॅक्टरी येथे ड्राय क्लिनींगचे दुकान असून तो शेअर मार्केट ट्रेडिंग करतो, अशी माहिती त्याने दिली.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याला पाच टक्के परतावा मिळतो, असे भोसलेने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. डॉक्टर चोरडिया यांच्या ओळखीमुळे चव्हाण यांनी भोसलेवर विश्वास ठेवला.
दरम्यान, चव्हाण यांच्या राहत्या घरावर एका पतसंस्थेचे सुमारे २० लाख रुपयांचे कर्ज असल्याने ते कर्ज फेडण्याच्या प्रयत्नात होते. याबाबत त्यांनी डॉक्टर चोरडिया यांना सांगितल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा त्यांच्या घरी चव्हाण आणि भोसले यांची बैठक घडवून आणली.
या बैठकीत भोसले याने चव्हाण यांना २० लाख रुपये दिल्यास ते आपल्या नावावर शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवून त्यातून चांगला परतावा मिळवून देऊ, तसेच दर महिन्याला एक लाख रुपये देऊ, असे आमिष दाखविल्याचा आरोप आहे.
कर्ज फेडण्याच्या उद्देशाने आणि डॉक्टरांच्या मध्यस्थीमुळे विश्वास ठेवून चव्हाण यांनी विविध माध्यमातून पैसे उभे केले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत सुमारे २४ लाख १९ हजार रुपये उभे केले. त्यापैकी २१ लाख ३ हजार रुपये संतोष भोसलेच्या बँक खात्यावर वेळोवेळी ऑनलाइन वर्ग केले.
👉लॉन्ड्रीवर गेला अन् भोसले गायब!
पैसे दिल्यानंतर काही दिवसांनी चव्हाण हे संतोष भोसले याला भेटण्यासाठी त्याच्या लॉन्ड्री दुकानावर गेले. मात्र, भोसले तेथे आढळून आला नाही. त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे दिसून आले.
त्यानंतर चव्हाण यांनी भोसलेच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र, तेथील नागरिकांकडून संतोष भोसले हा आपली आई, पत्नी आणि मुलीसह घर सोडून गेल्याची माहिती मिळाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
👉इतरांचीही अशाच पद्धतीने फसवणूक?
संतोष भोसले याने अशाचप्रकारे शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास दर महिन्याला मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून इतरांचीही फसवणूक केल्याचे आपल्याला समजल्याचे चव्हाण यांनी पोलिसांना सांगितले आहे.
या प्रकरणी राहुरी पोलिसांनी संतोष विनायक भोसले याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत. दरम्यान भोसले हा अनेक वर्षांपासून गायब असून त्याने अनेकांना गंडा घातला आहे.यापूर्वीही त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल असून या चव्हाण यांच्या फिर्यादीने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत