राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सन २०००-२००१च्या इयत्ता...

येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सन २०००-२००१च्या इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या ‘चैतन्य ग्रुप’ने शाळेसाठी विविध उपक्रम राबवत तब्बल एक लाख रुपयांपर्यंतची भरीव मदत केली. या कार्याबद्दल बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी शाळेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला.

डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे व संस्थेचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे, सेक्रेटरी हर्षदादा तनपुरे, खजिनदार रावसाहेब तनपुरे, सहसेक्रेटरी सुनील मोरे, विवेकानंद नर्सिंग होमचे उपाध्यक्ष भारत वारुळे, लक्ष्मीनारायण ट्रस्टचे उपाध्यक्ष अरुण ढूस, संचालक कृष्णा मुसमाडे व भास्कर ढोकणे उपस्थित होते.
सेवानिवृत्त शिक्षक हारदे सर, गाडे सर, भंडारी सर व वाकचौरे सर यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्कूल कमिटीचे प्रशांत काळे, अनिल कदम व योगेश आंबेडकर सर यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक शिरसाठ सर यांनी प्रास्ताविकात चैतन्य ग्रुपने मागील दोन महिन्यांत शाळेसाठी केलेल्या विविध मदतीची माहिती दिली. यामध्ये शालेय गणवेश, वह्या, १२ सायकली, ९ व्हाइट बोर्ड, २ पोर्टेबल साऊंड सिस्टीम, ४० स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे संच तसेच ११ हजार रुपयांचे शाळा रंगकाम साहित्य यांचा समावेश आहे.
चैतन्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अमित देशमुख यांनी ‘एक हात मदतीचा, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा’ या संकल्पनेतून ग्रुपची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. २५ वर्षांनंतर जुन्या मित्रांना पुन्हा एका व्यासपीठावर आणण्यासोबतच मातृशाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ९ व्हाइट बोर्डचे अनावरण करण्यात आले. चैतन्य ग्रुपचे अमित देशमुख, अमोल गीते यांच्या मातोश्री मंगला पोपटराव गीते, वेदांत गीते, डॉ. अभिजित शिरसाठ, अनुप कोंडेकर यांचे वडील शिवाजी कोंडकर, वसंत वरखडे, अमोल वरखडे, किरण गायके, राहुल साळुंके, जाकीर शेख, धनंजय डोंगरे, नागिनाथ लोंढे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. लवकरच माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर आयोजित करण्याची कल्पनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात अरुण तनपुरे यांनी चैतन्य ग्रुपच्या संकल्पनेचे व कार्याचे कौतुक केले. सोशल मीडियाचा सकारात्मक आणि समाजोपयोगी वापर कसा करता येतो, याचे चैतन्य ग्रुप हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. मातृशाळेसाठी माजी विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. आगामी काळात शाळेची संरक्षण भिंत, शाळा रंगकाम तसेच राहुरी पब्लिक स्कूलचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे आभार पाटील सर यांनी मानले, तर सूत्रसंचालन निमसे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शिरसाठ सर यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षक चव्हाण सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत