जामखेड खर्डा येथे डोळ्यांत मिरची पावडर टाकून कोयत्याने वार करून तान्हाजी भास्कर बोराडे (रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) यांचा खून करण्...
जामखेड
खर्डा येथे डोळ्यांत मिरची पावडर टाकून कोयत्याने वार करून तान्हाजी भास्कर बोराडे (रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) यांचा खून करण्यात आला होता. या खूनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून अवघ्या दोन दिवसांत छडा लावला. या प्रकरणात एका १८ वर्षीय तरुणासह तीन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दि. ११ सप्टेंबर रोजी तान्हाजी बोराडे हे खर्डा येथे असताना मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना ठार केले. याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार शाहीद शेख, अभिजीत अरकल, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल आजबे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा आत्तार, अरुण मोरे, फुरकान शेख व प्रशांत राठोड यांचे पथक तयार केले.
पथकाने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हा गुन्हा प्रसाद अशोक अडागळे याने त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांसह केल्याची माहिती समोर आली. मुख्य आरोपी पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पुणे शहरात जाऊन एका १७ वर्षीय विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले.
त्यानंतर तपासात इतर आरोपी टाकळीमिया, ता. राहुरी येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने कारवाई करत प्रसाद अशोक अडागळे (वय १८, रा.टाकळीमिया) याच्यासह १६ व १७ वर्षे वयाच्या आणखी दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपींना पुढील तपासासाठी खर्डा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार शाहीद शेख, अभिजीत अरकल, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल आजबे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा आत्तार, अरुण मोरे, फुरकान शेख व प्रशांत राठोड यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत