देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील लाख रोड परिसरातील मुसमाडे वस्ती व काळे वस्ती येथील काही घरांना कमी...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील लाख रोड परिसरातील मुसमाडे वस्ती व काळे वस्ती येथील काही घरांना कमी दाबाने व अपुऱ्या प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आपली समस्या स्थानिक नगरसेवकांकडे मांडली होती.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक सौरव मुसमाडे व सीमा देठे यांनी सदर पाणीप्रश्नाची माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे मांडली. त्यानंतर नगराध्यक्ष कदम यांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, या भागातील नागरिकांना अपेक्षित प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर उपलब्ध पाणीपुरवठा यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा वाढविण्यासाठी विविध तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, या प्रयत्नांनंतरही अपेक्षित प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने मुसमाडे वस्ती आणि काळे वस्ती या भागांसाठी नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचा निर्णय नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. त्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारी नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.
या नवीन पाईपलाईनमुळे मुसमाडे वस्ती व काळे वस्तीतील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, कमी दाबाने किंवा अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
या नवीन पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक सौरव मुसमाडे, नगरसेविका सीमाताई देठे, देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन उत्तम मुसमाडे, शिवाजी मुसमाडे, दत्तात्रय मुसमाडे, अंबादास मुसमाडे, ऋषिकेश मुसमाडे, रावसाहेब देठे, गोवर्धन मुसमाडे, सागर ढूस आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत