देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग, आत्मा, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी प्रक्रिय...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग, आत्मा, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी प्रक्रिया उद्योगक शास्त्रज्ञ मंच’ची नुकतीच स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी पिंपळगाव फुणगी येथील प्रयोगशील शेतकरी प्रा. सतिश राऊत यांची निवड कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी जाहीर केली आहे.
राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास खर्चे होते.
कृषी प्रक्रिया उद्योगक शास्त्रज्ञ मंचच्या उप अध्यक्ष पदी श्रीरामपूर येथील नानासाहेब तांबे, सचिव पदी अकोले तालुक्यातील सुगावचे आशिष देशमुख तर सह सचिव म्हणून लोणी येथील यश शिंदे यांची निवड झाली आहे.
प्रा. सतिश राऊत यांच्या नेतृत्वातून शेतकरी, उद्योजक आणि शास्त्रज्ञ यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन कृषी प्रक्रिया उद्योग, ग्रामीण उद्योजकता तसेच शाश्वत शेती विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कृषी उत्पादनावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन, शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागातील युवकांना उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला चालना देण्याचा संकल्प मंचाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
‘नवे नेतृत्व, नवी ऊर्जा, नवे संकल्प’ या भावनेतून कृषी क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणून शेतकरी समृद्धी, कृषी मूल्यवर्धन आणि ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी एकत्रितपणे वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
अन्नप्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड पुढाकारातून संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. विक्रम कड, प्रदीप लाटे,डॉ. पंडित खर्डे, सतीश राऊत, मंजुळा देशमुख उपस्थित होते. फुले मिल्क ब्रेड पॅकेजिंग डिझाइन आणि शेतकरी-उद्योजक शास्त्रज्ञ मंचाचे उद्घाटन करण्यात आले. मंचाचे अध्यक्ष सतीश राऊत, नानासाहेब तांबे, आशिष देशमुख, यश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. रेश्मा जाधव व प्रतीक्षा पुराणिक यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत