राहुरी(वेबटीम) मातृत्व, बाळाची काळजी आणि वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाचा अत्यंत कठीण प्रवास यांचा समर्थपणे समतोल साधत सांगलीच्या डॉ. मयुरी भाऊ...
राहुरी(वेबटीम)
मातृत्व, बाळाची काळजी आणि वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाचा अत्यंत कठीण प्रवास यांचा समर्थपणे समतोल साधत सांगलीच्या डॉ. मयुरी भाऊसाहेब खेवरे यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक यांच्या Obstetrics & Gynaecology (प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र) विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेत महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाने अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव राज्यभरात उज्ज्वल केले आहे.
विशेष म्हणजे, परीक्षेच्या काळात डॉ. मयुरी यांचा मुलगा पद्मराज अवघ्या सहा महिन्यांचा होता. एका बाजूला मातृत्वाची जबाबदारी, बाळाची संगोपन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या, तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षणातील कठोर अभ्यास आणि परीक्षेची तयारी, अशा दुहेरी आव्हानांना पुरून उरत त्यांनी मिळवलेले हे यश विशेष प्रेरणादायी ठरले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले असून, त्यांच्या या कामगिरीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात अभिमानाचा माहोल निर्माण झाला आहे.
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. मयुरी खेवरे म्हणाल्या, “या यशामागे माझ्या गुरुजनांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे आशीर्वाद आणि माझ्या पतीचा मोलाचा पाठिंबा आहे. यामुळेच हे यश शक्य झाले.”
त्या पुढे म्हणाल्या, “एक आई, पत्नी आणि डॉक्टर म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना मिळालेले हे यश माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. माझ्या या प्रवासात माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेल्या माझ्या प्रिय पद्मराज (मुलगा) आणि योगेश सुंबे (पती) यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. भविष्यातही वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून समाजाची सेवा करण्याची प्रेरणा या यशातून मिळाली आहे.”
डॉ. मयुरी खेवरे या शिवसेना पक्षाचे नेते रावसाहेब खेवरे यांच्या पुतणी आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातून खेवरे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
मातृत्व ही जबाबदारी आणि स्वप्नपूर्ती ही जिद्द या दोन्हींचा सुंदर समतोल साधत डॉ. मयुरी खेवरे यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण राज्यातील अनेक विद्यार्थिनी, माता आणि तरुण डॉक्टरांसाठी एक नवा आदर्श ठरले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत